पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट या लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघाचे खासदार झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रिक्त झाले आहे. पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे या दोघांच्या नावाची चर्चा असून पालकमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील मंत्रिमंडळाचा जून महिन्यात विस्तार होणार आहे. त्यामध्ये आमदार जगताप किंवा भेगडे या दोघांपैकी एकाची कॅबिनेट अथवा राज्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद येऊ शकते. विधानसभा निवडणुका चार महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, केव्हा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे देखील पालकमंत्रिपद देण्याची शक्यता आहे. सध्या कांबळे परभणीचे तर शिवतारे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
पालकमंत्री पदासाठी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कारण जगताप यांनी अजित पवार यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता मिळवली. महापालिकेत सत्ता आल्यास लाल दिवा देण्याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चिंचवड मधून तब्बल ९६ हजार ७५८ हजारांचे मताधिक्य जगताप यांनी मिळवून दिले. त्यामुळे बारणे त्यांचा मोठा विजय झाला. या कामगिरीमुळे जगताप यांचे पारडे पालकमंत्री पदासाठी जड मानले जात आहे. जगताप यांच्या आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. त्यात एक वेळेस विधानपरिषदेचे देखील त्या आमदार होते. त्यांचा अनुभव दांडगा आहे. दरम्यान भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या एकही आमदाराला मंत्रीपद दिले नाही. पण आता इतर पक्षातून आलेले आमदार नाराज होऊ नये म्हणून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रीपद दिले जाऊ शकते.
पालकमंत्री पदासाठी भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे हे देखील प्रमुख दावेदार मानले जात आहेत. सलग दोन वेळा निवडून आले आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे. तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी नगरपरिषदेत भाजपची सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना मावळमधून त्यांनी २१ हजार ८२७ मतांची आघाडी मिळवून दिली आहे. भाजपचे निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदासाठी भेगडे सुद्धा प्रबळ दावेदार मानले जात आहेत.