पिंपरी (Pclive7 com):- मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सर्वाधिक चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मताधिक्क्य मिळवून देण्यात भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यशस्वी ठरल्यामुळे बारणे यांच्या विजयाबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत. या निवडणुकीत जगताप मावळचे ‘किंगमेकर’ ठरले असून त्यांना पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील ‘भाऊबली’ अशी उपाधी सोशल मीडियावर दिली जात आहे.
पिंपरी चिंचवडचे राजकारण आमदार लक्ष्मण ‘भाऊ’ जगताप यांच्याभोवती केंद्रीत असल्याने त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे युती धर्म पाळून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची जबाबदारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खांद्यावर सोपवली होती. राजकीय वैर बाजूला ठेवून भाऊंनी ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. निवडणुकीपूर्वी भाऊंचे बारणेंसोबत खरंच मनोमिलन झालायं का? याबाबत अनेक तर्क लढवले जात होते. मात्र पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघातून तब्बल १,३८,०५२ एवढे मताधिक्य बारणे यांना देऊन भाऊंनी मुख्यमंत्र्यांना दिलेला ‘शब्द’ पाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर युतीच्या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाऊंना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. तर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मावळच्या राजकारणात ‘किंगमेकर’ भाऊच अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील ‘भाऊबली’ अशी उपाधी देखील त्यांना देण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group