पिंपरी (Pclive7.com):- लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षात युती होणारच आहे. आमच्यात ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्मुला ठरला असून निवडणुकीत विधानसभेवर भगवाच फडकेल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या नव्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संत तुकारामनगर येथे दानवेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रावसाहेब दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले. त्यामुळेच युतीला घवघवीत यश मिळाले. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना भाजपची युती होणार आहे. आमचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ चा फॉर्मुला ठरला आहे. सेना आणि भाजपा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन आम्ही जागा वाटपा संदर्भात निर्णय घेतला आहे. येत्या विधानसभेत राज्यात भाजपा शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.