पिंपरी (Pclive7.com):- तुम्ही भटक्या कुत्र्यांचा, डुक्करांचा किंवा मोकाट जनावरांचा त्रास होतो म्हणून तक्रारी केल्याचे ऐकले असेल. पण आता रात्रीच्यावेळी भटक्या मांजरी रडतात, ओरडतात, म्हणून झोप मोड होत आहे, अशी तक्रार शहरातील सुज्ञ नागरिकांनी चक्क “सारथी’ वर तक्रारी केल्या आहेत. सारथीवरील अशाप्रकारच्या तक्रारी अर्जाने महापालिका अधिकारी मात्र चक्रावले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेने जनहितार्थ ‘सारथी’ची सोय केली आहे. यावर नागरिक विविध नागरी समस्यांबाबत बिनधास्तपणे तक्रार दाखल करू शकतात. पण आता या सारथीवर ‘भटक्या मांजरी’ विरोधात सप्टेंबर अखेर दहा तक्रार दाखल झाल्या आहेत. शाहूनगर, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, अजमेरा कॉलनी, आकुर्डी – चिखली, साने चौक आदी परिसरातून मांजरी त्रास देत असल्याच्या तक्रार अर्ज सारथीवर प्राप्त झाले आहेत. रात्री, मध्यरात्री मांजरीच्या आवाजामुळे झोप मोड असल्याच्या गमतीशीर तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणाले, आमच्याकडे मांजरी पकडण्यासाठी पथके नाहीत. आणि त्यांची माहिती देखील आम्ही ठेवत नसल्याचा निर्वाळा दिला. पण वाढत्या तक्रारीमुळे या मांजरांचे काय करायचे, हा प्रश्न प्रशासनासोबतच नागरिकांना पडला आहे.
अशा आहेत गंमतशीर तक्रारी..
पिंपळे सौदागरमधील एका तक्रारदाराने म्हटले, ‘फास्ट फूड सप्लायर व दुर्गा कॅफेवाले भटकी कुत्री व मांजरींना आकर्षित करणारे अन्न कचरा उघड्यावर टाकत आहे. ते खाण्यासाठी मांजरी जमा होतात. त्यातून त्यांच्यात भांडणे होतात. त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजाचा खूप त्रास होत आहे.’
शाहूनगरमधील एका महिलेने तक्रारीत म्हटले, ‘आमच्या यशलक्ष्मी सोसायटीमध्ये भटक्या मांजरींचा वावर खूप वाढला आहे. त्या मांजरी शेजारच्या सोसायटीमधून येत आहेत. रात्रीच्या वेळी मांजरीच्या रडण्याचा आवाज येत असल्याने झोप मोड होतेय, तसेच त्या खिडकीतून घरात प्रवेश करतात. त्यांच्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने भटक्या मांजरींना पकडण्यासाठी पथक पाठवावे.’























Join Our Whatsapp Group