पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी, दापोडी, बोपखेल परिसरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. तात्काळ या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी युवासेना पिंपरी विधानसभेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश दगडे यांना यासंदर्भात युवासेनेने निवेदन दिले आहे.
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पिंपरी महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश दगडे यांना भेटून निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, फुगेवाडी, दापोडी तसेच बोपखेल परिसरात सध्या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला अाहे. नागरिकांच्यावर हल्ला करणे, गाड्यांचा पाठलाग करणे, चावा घेणे असे अनेक प्रकार घडत आहेत. विशेष करून लहान मुलांना या कुत्र्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मोटार सायकल चालवणारे, सायकल चालवणारे व सकाळी जॉगिंगला जाणाऱ्या नागरिकांवरती तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवरती हि भटकी कुत्री हल्ला करत आहेत. कुत्रा चावल्यास घ्यायला लागणाऱ्या लसींचा तुटवडा देखील महापालिकेच्या रूग्णालयात आहे. त्यामुळे अत्यंत खाजगी रूग्णालयातील महागडी औषधे तसेच उपचार करावा लागत असल्यामुळे नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.
फुगेवाडी दापोडी परिसरातील भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा. तसेच त्यांचे लसीकरण करण्यात यावे. नागरिकांची या दहशतीमधून मुक्तता करण्यात यावी. अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पिंपरी युवासेनेने दिला आहे. यावेळी युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, शाखाप्रमुख प्रमोद शिंदे, मनोज काची, टोनी मकासरे, सुनील कदम, बाबू पाटील, उपस्थित होते.