पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील डुकरांपासून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डूकरे पकडण्याची मोहीम सुरू केली असून आज केलेल्या कारवाईत सुमारे १०८ डूकरे पकडण्यात आली.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात असणाऱ्या डूकरांमुळे निर्माण होणाऱ्या सार्वजनिक उपद्रव व प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे यांच्या पथकाने आज पासून कारवाई सुरू केली.
महापालिकेच्या २० जणांच्या पथकामार्फत डूकरे पकडून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आराखडा तयार केला असून त्यानुसार डूकरे पकडण्याची कारवाई करण्यात आली. आजच्या या कारवाईत थेरगाव, भाटनगर, डालको कंपनी परीसर व लिंक रोड पिंपरी भागातील सुमारे १०८ डूकरे पकडण्यात अली. या कारवाईत दरम्यान डुक्करे पाळणाऱ्या व्यावसायिकांकडून विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि पोलिस निरीक्षक विरेंद्र चव्हाण यांनी त्यांच्याशी समन्वय साधून केलेल्या कारवाईला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यापुढेही महापालिकेमार्फत मोकाट व भटकी डूकरे पकडण्याची विशेष मोहिम अधिक तिव्रतेने व प्रभाविपणे राबविण्यात येणार असून लवकरात लवकर शहर ‘डुक्कर मुक्त’ करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही मोहीम या पुढेही सुरू ठेवण्यात येणार असून त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी केले.






















Join Our Whatsapp Group