पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगावातील गव्हाणे आळी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथील रस्त्यावर ड्रेनेज जवळचा खड्डा अतिशय धोकादायक झाला होता. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत होते. म्हणूनच झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांनी अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. आज दुपारी या धोकादायक खड्ड्याचे विधीपूर्वक पूजन करून काळा झेंडा लावत महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे.
या आंदोलनाबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे म्हणाले की, शहरात अनेक भागात मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. पिंपरीगावातील गव्हाणे आळी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौका जवळच्या मुख्य रस्त्यावर धोकादायक पध्दतीचा खड्डा झाला होता. तक्रार करूनही प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नव्हती. एखाद्या निष्पाप नागरिकाचा या खड्ड्यामुळे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? म्हणूनच या ठिकाणच्या खड्ड्याची विधीपूर्वक हळदी, कुंकू, बुक्का वाहत, अगरबत्ती लावून पूजन केले. तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून काळा झेंडाही तेथे लावण्यात आला. लवकरात लवकर पालिका प्रशासनाने हा खड्डा बुजविला नाही तर तीव्र पध्दतीने आंदोलन केले जाईल असा इशाराही संजय गायखे यांनी दिला आहे.