पिंपरी (Pclive7.com):- माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कलारंग प्रतिष्ठानच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जेष्ठ मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा सन्मान सोहळा होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, देशातील राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील सुसंस्कृत नेतृत्व मा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शहरातील नाट्य, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. त्यामध्ये ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक मधु जोशी, शास्त्रीय संगीत विशारद जयश्री लेले, ऑलम्पिक वीर पैलवान मारुती आडकर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ क्रिकेटपटू मिलिंद गुंजाळ, ज्येष्ठ लोककला कलावंत प्रबोधनकार शारदा मुंडे, संगीत विशारद विद्याधर शिधये, प्रसिद्ध लोककलावंत संजीवनी मुळे नगरकर, ज्येष्ठ नाट्यकलावंत जंगलराव भोईर, ज्येष्ठ भरतनाट्यम् विशारद (कथ्थक) गीता शर्मा आणि चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त विघ्नहरी देव महाराज या सर्व मान्यवरांचे यथोचित सन्मान करण्यात येणार आहेत. तसेच या सोहळ्यानंतर झी कॉमेडी अवॉर्ड विजेते “यदा कदाचित रिटर्न” या मराठी नाटक प्रयोग देखील सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य सादर केला जाणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.