पिंपरी (Pclive7.com):- पवनाथडी जत्रेसाठी स्थापत्य विषयक कामे त्वरित पुर्ण करावीत अशी सूचना सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी स्थापत्य अभियंत्यांना केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांगवी येथील पी.डब्लू.डी. मैदानावर येत्या ४ मार्च पासून ८ मार्च पर्यंत पवनाथडी जत्रेचे आयोजन केलेले आहे, त्याची पाहणी करीत असताना ते बोलत होते.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, नागरवस्ती विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, उपअभियंता विजयसिंह भोसले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पॉईंट ऑफ व्ह्यूव संस्थेचे डॉ. गिरीश रांगणेकर, प्रसाद कुलकर्णी, सुमित जैन आदी उपस्थित होते.
पवनाथडी जत्रेत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार असून महानगरपालिकेतर्फे मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम होणार आहेत. आज बचतगटाची सोडत महानगरपालिकेत पार पडली. महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे व समिती सदस्या उपस्थित होत्या. सर्व अर्जदारांना स्टॉलचे वाटप करण्यात आले असून जत्रेच्या ठिकाणी एकूण १२२५ स्टॉल असणार आहेत. त्यामुळे विविध वस्तू खरेदी करणा-यांसाठी तसेच खवय्यासाठी मेजवानी ठरणारी ही जत्रा असणार आहे.