पिंपरी (Pclive7.com):- दिल्लीत पुन्हा एकदा विजय मिळविल्यानंतर आम आदमी पार्टी आता देशभरात आपले पाय रोवण्यास सुरुवात करत आहे. ‘आप’ने आता पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातही सक्रिय सहभाग घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. पक्षातर्फे महापालिकेची २०२० मधील निवडणूक लढविण्यात येणार असल्याची घोषणा करत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहरातील गावकी-भावकीच्या राजकारणाला शह देण्याचा दावा केला आहे. पक्षातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
पत्रकार परिषदेला पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, पुणे विभाग संघटन मंत्री अभिजित मोरे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, प्रवक्ते कपिल मोरे आदी उपस्थित होते. यावेळी शहरात होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी महापालिकेने प्रभावी उपाययोजना करायला हवी. शहरातील पाण्याचे ऑडिट आवश्यक असून त्याबाबत महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी ‘आप’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. किर्दत म्हणाले, दिल्लीतील निवडणुकांनी राजकारण बदलले आहे. ‘कामावर मत’ याला सध्या प्राधान्य दिले जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राजकारण बदलण्यासाठी ‘आप’ने नवा पर्याय देण्याचे ठरविले आहे. आगामी २०२० मधील महापालिका निवडणूक ‘आप’ लढविणार आहे. शहरात सध्या ठराविक घराण्याची सत्ता आहे. गावकी-भावकीचे राजकारण आहे. त्याला ‘आप’तर्फे शह देण्यात येईल. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याबाबत तोडगा निघायला हवा.’
मोरे म्हणाले, ‘आप’कडून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: महापालिका स्तरावरील निवडणुका लढविण्यात येणार आहे. आपने दिल्लीत मिळविलेल्या यशाने जातीपातीच्या राजकारणाला फाटा दिला. ‘दिल्ली मॉडेल’ विरूद्ध ‘गुजरात मॉडेल’ अशी निवडणूक झाली. पक्षातर्फे सध्या २३ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group