पिंपरी (Pclive7.com):- महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हे पवनाथडी जत्रेचे मुख्य उद्दिष्ट असून महिला सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने नवी सांगवी येथे आयोजित पवनाथडी जत्रेचे उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर यांची विशेष उपस्थित होती.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, शिक्षण समिती सभापती मनीषा पवार, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे तसेच नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहताना कोणीतरी आपल्या पाठीशी आहे हि भावना निर्माण व्हावी म्हणून महानगरपालिका विविध योजना राबवीत असते. महानगरपालिका विविध योजनांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करते. पाच दिवस चालणाऱ्या या जत्रेमध्ये पिंपरी चिंचवडकर नागरिकांनी मोठ्या संख्येने येऊन महिला बचत गटांना आपला पाठींबा द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
पद्मश्री राहीबाई पोपरे म्हणाल्या, महिला बचत गटांसाठी एवढे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे हे पाहून आनंद झाला. गरिबीमुळे मला शिकता आले नाही परंतू निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकले. बचत गटांच्या माध्यमातून पिकांच्या जातींबद्दल मला माहिती मिळाली. आज बाजारामध्ये उपलब्ध होत असलेल्या भाज्यांमध्ये चमक असली तरी धमक बिल्कुल नाही. आज उपलब्ध असलेल्या भाज्या आरोग्यास हानिकारक आहेत. जुनं ते सोनं असतं म्हणूनच बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी जुन्या परंपरांचे जतन करणे आवश्यक आहे. प्रत्येक गावी पैशांच्या अनेक बँका आहेत परंतू देशी बियांच्या बँका सुरु होणेही गरजेचे आहे. काळ्या मातीशी नातं जोडलं म्हणून मला अनेक पुरस्कार मिळाले असेही त्या म्हणाल्या.
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महिलांच्या उत्पादनाला व्यासपीठ मिळवून देणे हे पवनाथडी जत्रेचे मुख्य उदिष्ट आहे. यावर्षी महानगरपालिकेने प्लास्टिक मुक्त पवनाथडी जत्रेचा संकल्प केला आहे. विविध माध्यमातून या उपक्रमाची प्रसिद्धी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.
महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे म्हणाल्या, महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. महिला सक्षमीकरणासाठी महानगरपलिका कटिबद्ध आहे. पवनाथडी जत्रेची लोकं आतुरतेने वाट होते. पवनाथडी जत्रा ही वर्षातून केवळ एकदा न होता २-३ वेळा व्हावी अशी नागरिकांची इच्छा आहे.
रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर म्हणाल्या, पवनाथडी जत्रेचे हे सलग १२ वे वर्ष आहे यातूनच या जत्रेच्या लोकप्रियतेची प्रचीती येते. अशाच प्रकारे महिलांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका शुभांगी शिंदे यांनी केले तर आभार माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसदस्य विलास मडीगेरी यांनी मानले. यानंतर भवानी प्रोडक्शनचे अरुण गायकवाड यांनी जल्लोष महाराष्ट्राचा हा मराठमोळी संस्कृती सांगणारा कार्यक्रम सादर केला.






















Join Our Whatsapp Group