पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील आरोपींना घेऊन सीआयडीचे पथक घटनास्थळी दाखल होताच परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी आरोपींविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

सीआयडीचे पथक पंचनामा आणि तपासासाठी आरोपींना फुगेवाडीत घेऊन आले होते. आरोपींना पाहताच मृतांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी एका वृद्ध महिलेने चप्पल हातात घेऊन आरोपींसमोर उभे राहत आपला संताप व्यक्त केला. तर काही तरुणांनी सिमेंट ब्लॉक आणि दगड उचलून आरोपींकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला.

परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सीआयडी अधिकारी आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलिसांनी नागरिकांना रोखत आरोपींना सुरक्षितपणे ताब्यात ठेवले. त्यामुळे संतप्त जमावाच्या तावडीतून आरोपींची सुटका झाली. दरम्यान, सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आवश्यक पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया पूर्ण केली. तपास आटोपून पथक परतत असताना झालेला हा संपूर्ण प्रकार उपस्थित नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.
विषारी दारू प्रकरणात झालेल्या मृत्यूंमुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा रोष या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group