पिंपरी (Pclive7.com):- म्हाळुंगे सावरदरी येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या ‘टाईने रिबेल’ या बीअर उत्पादन कंपनीमधून तब्बल ३६ लाख रुपये किमतीचे १० बीअर स्टोअरेज टँक चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा छडा लावत उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या एका विश्वासू माजी कामगारानेच हा चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

फिर्यादी विवेक खैरे यांना सुमारे ४० दिवसांनंतर या चोरीची माहिती मिळाल्याने तपासासाठी पोलिसांकडे कोणताही ठोस धागादोरा नव्हता. मात्र पोलिसांनी हार न मानता परिसरातील ३० ते ३५ कंपन्यांचे तब्बल ६०० जीबीपेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या तपासादरम्यान संशयित क्रेन आणि ट्रकची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कंपनीचा माजी कामगार प्रसाद विनोद राजळे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रसाद राजळे याच्यासह चंदन अर्जुन सिंग, अली अहमद चौधरी, फिरोज असगर अली खान, किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता आणि नियाज मोहम्मद इसराईल यांना अटक केली.
आरोपींकडून कुदळवाडी, चिखली आणि मुंब्रा परिसरातून चोरीस गेलेल्या १० स्टील टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अत्यंत क्लिष्ट आणि कोणताही थेट पुरावा नसलेल्या या गुन्ह्याचा अवघ्या तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि पोलिसांच्या चिकाटीमुळे उलगडा झाला असून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.




















Join Our Whatsapp Group