पिंपरी (Pclive7.com):- पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. ,काल माजी आमदार विलास लांडे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर टीका करत नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

एका प्रसारमाध्यमाशी बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, “पक्षात आता ‘राम’ राहिलेला नाही, सर्व निर्णय ‘लव-कुश’ घेतात. पुणे विधान परिषद निवडणुकीत जुन्या बाटलीमध्ये नवीन दारू भरल्यासारखी परिस्थिती आहे. पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते.”
यावेळी त्यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. “पक्षात एकच राम होता, तो म्हणजे अजित पवार. आता निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षात भविष्य उरलेले दिसत नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले.

पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यात आता संदीप वाघेरे यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. त्यांच्या या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान, संदीप वाघेरे यांच्या या वक्तव्यावर पक्ष नेतृत्वाकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group