पिंपरी (Pclive7.com):- पवना धरणात सुमारे ९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला असताना पिंपरी-चिंचवड शहरावर लागू असलेली १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून पूर्ववत नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

याबाबत नाना काटे यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून, पवना धरण आज जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही शहरातील नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वी ८ जुलै २०२६ रोजी धरणात ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध असतानाच पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यावर त्यांनी लक्ष वेधले आहे.

शहरातील हजारो गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांना कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून प्रशासनाविषयी नाराजी वाढत असल्याचेही नाना काटे यांनी म्हटले आहे.

पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना कृत्रिम पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणे योग्य नसल्याचे नाना काटे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शहरावरील १५ टक्के पाणी कपात रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणे नियमित, सुरळीत व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी पिंपरी-चिंचवडकर नागरिकांच्या वतीने केली आहे.



















Join Our Whatsapp Group