पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील गजबजलेल्या शिवार चौकात भरधाव थार चालकाने पोलिसांच्या कारवाईला न जुमानता धक्कादायक थरार घडविल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी अडवूनही वाहनासह पसार झालेल्या चालकाविरोधात पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.११ सप्टेंबर) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास एमएच 14 एम क्यू 77 क्रमांकाची काळ्या रंगाची थार गाडी बीआरटी मार्गावरून भरधाव वेगाने येत होती. वाहनाच्या काचांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. शिवार चौकात तैनात असलेल्या पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन थांबविण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
यावेळी वाहन मागे घेताना चालकाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतरही तो न थांबता कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अडवूही घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संबंधित वाहनाचा माग काढला. तपासादरम्यान थार वाहन सुयश उर्फ कृष्णा काटे हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, अपघात करून पळून जाणे तसेच वाहनावर बनावट क्रमांक प्लेट वापरणे आदी गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



















Join Our Whatsapp Group