पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २७ मधील कै. भिकोबा तांबे प्राथमिक शाळा व मेमोरियल हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच नागरिकांनाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

‘ड’ क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक गणेश राजगे तसेच आरोग्य मुकादम प्रदीप जगताप, आबासाहेब कदम, किरण त्रिभुवन आणि डिवाईन सुपरवायझर यश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली डिवाईन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेसच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच गणेशमूर्ती स्पर्धेचे आयोजन करून सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर ‘माझी वसुंधरा ७.०’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी गणेशोत्सवात प्लास्टिकचा वापर टाळणे, नैसर्गिक व पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य देणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हरित शिक्षक शपथ घेण्यात आली आणि स्वच्छतेच्या घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
“विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जाणीव निर्माण झाल्यास हा संदेश कुटुंब आणि समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा,” असे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे यांनी सांगितले.
“गणेशोत्सवाची भक्ती आणि उत्साह कायम राखत पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,” असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती किन्हाळे, मुख्याध्यापक श्री. सर्जे तसेच शिक्षकवर्गाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.




















Join Our Whatsapp Group