पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर, रहाटणी व काळेवाडी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या समस्येची तातडीने दखल घेऊन गणेशोत्सव काळात परिसरात सुरळीत व अखंडित वीजपुरवठा ठेवावा, अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता सुनील कदम यांच्याकडे केली आहे.

गणेशोत्सव हा नागरिकांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि उत्साहाचा सण आहे. या काळात परिसरातील विविध गणेश मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशा वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास गणेश मंडळांसह नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी परिसरातील वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, फिडर तसेच विद्युत यंत्रणेची पूर्वतपासणी व आवश्यक देखभाल करण्यात यावी. संभाव्य तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन आवश्यक मनुष्यबळ व दुरुस्ती यंत्रणा सज्ज ठेवावी आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी सूचनाही नाना काटे यांनी केली.

तसेच पिंपळे सौदागर विद्युत विभागाच्या कुणाल आयकॉन येथील ऑफलाइन वीज बिल भरणा केंद्र काही कारणास्तव बंद करण्यात झाले आहे. हे केंद्र नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचे असून, नागरिकांना वीज बिल भरण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता हे ऑफलाइन वीज बिल भरणा केंद्र तातडीने पुन्हा सुरू करावे, अशी मागणीही नाना काटे यांनी केली आहे. यावेळी युवा नेते उमेश काटे, उद्योजक काळुराम कवितके, बजरंग भालेकर, शुभम काटे, विशाल काटे उपस्थित होते.
“गणेशोत्सव हा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा सण आहे. नागरिकांचा उत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि आनंदात पार पडण्यासाठी महावितरणने वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. गणेशोत्सवाच्या काळात वारंवार वीज खंडित होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी कुणाल आयकॉन येथील बंद असलेले ऑफलाइन वीज बिल भरणा केंद्र तातडीने सुरू करावे,” असे नाना काटे यांनी सांगितले.– विठ्ठल उर्फ नाना काटेमाजी विरोधी पक्षनेता तथा नगरसेवकपिंपरी चिंचवड महानगरपालिका




















Join Our Whatsapp Group