पिंपरी (Pclive7.com):- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

रत्नाकर महाजन हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक-राजकीय कार्यकर्ते म्हणून परिचित होते. दीर्घकाळ काँग्रेस पक्षाशी जोडलेले राहून त्यांनी पक्षाची भूमिका विविध व्यासपीठांवर प्रभावीपणे मांडली. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.
महाजन यांनी १९९९ ते २००९ या कालावधीत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. राज्याच्या विकास आणि नियोजनाशी संबंधित विविध विषयांवर त्यांनी या पदावरून योगदान दिले.

काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. पक्षाची विचारधारा, सामाजिक प्रश्न आणि राजकीय घडामोडी यावर सातत्याने भूमिका मांडण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या रत्नाकर महाजन यांच्या निधनाने काँग्रेसने ज्येष्ठ नेत्याला गमावले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.



















Join Our Whatsapp Group