पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डनच्या बासुरी बॅंक्वेट हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आपला आवाज आपली सखी’ प्रस्तुत कलाग्राम शॉपिंग फेस्टिव्हलचा दिमाखदार शुभारंभ भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरसेविका अनिताताई काटे आणि कुंदाताई भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला उद्योजकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच नागरिकांना सणासुदीच्या खरेदीची एकाच छताखाली संधी मिळावी, या उद्देशाने या तीन दिवसीय शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘कलाग्राम’सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक खरेदीला प्रोत्साहन देणारे हे प्रदर्शन नागरिकांसाठी मोठी संधी आहे. महिला व नागरिकांनी या फेस्टिव्हलचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.”

या फेस्टिव्हलमध्ये आकर्षक साड्या, रेडिमेड कपडे, नवनवीन डिझाईन्सचे दागिने, ॲक्सेसरीज, विविध भेटवस्तू तसेच होम डेकोर उत्पादनांचे शेकडो स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. महिला उद्योजकांनी सादर केलेल्या विविध उत्पादनांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील महिला उद्योजक, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सणासुदीच्या खरेदीसाठी आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




















Join Our Whatsapp Group