पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगारेटची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी कारवाई करण्यात आली. मे २०२६ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एकूण ७२ अवैध पानटपऱ्या निष्कासित करण्यात आल्या.

शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे, त्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे आणि शैक्षणिक परिसरातील वातावरण सुरक्षित व स्वच्छ राखणे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत परिमंडळनिहाय मोठ्या प्रमाणात टपऱ्या हटविण्यात आल्या. त्यामध्ये परिमंडळ-१ मधील १७, परिमंडळ-२ मधील १८, परिमंडळ-३ मधील २३ आणि परिमंडळ-४ मधील १४ अशा एकूण ७२ पानटपऱ्यांचा समावेश आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देत शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. तसेच नागरिकांनीही अशा प्रकारच्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यास पोलीस व महापालिकेला कळवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त व सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी पोलीस आणि महापालिकेची ही संयुक्त मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे.




















Join Our Whatsapp Group