पिंपरी (Pclive7.com):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्थापन केलेल्या ऐतिहासिक पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय सदस्यपदी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. या गौरवपूर्ण नियुक्तीबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पिंपरी येथील जनसंपर्क कार्यालयात भेट देत त्यांचा उत्साहात सत्कार केला.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ, शाल आणि शुभेच्छा देऊन अण्णा बनसोडे यांचे अभिनंदन केले. पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीची अशा ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेवर झालेली नियुक्ती शहरासाठी अभिमानास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सत्कार कार्यक्रमात रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे, रिपब्लिकन पक्षाचे नेते सुरेश निकाळजे, लढा युथ मूव्हमेंटचे प्रमोद क्षिररसागर, अंजना गायकवाड, माधव मुळे, स्वप्निल रोकडे, राहुल सोनवणे, संदीप पिसाळ यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, बहुजन आणि दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. या संस्थेने देशातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. अशा संस्थेच्या शासकीय सदस्यपदी अण्णा बनसोडे यांची निवड होणे ही पिंपरी-चिंचवडसाठी गौरवाची बाब असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात शहरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ‘विधानसभा उपाध्यक्ष माननीय आमदार अण्णा बनसोडे गौरव समिती’ स्थापन करण्यात आली असून समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सर्वसमावेशक कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे. कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि स्थळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
अण्णा बनसोडे यांच्या या नियुक्तीमुळे शिक्षण क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा अधिक प्रभावीपणे पुढे नेला जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


















Join Our Whatsapp Group