पिंपरी (Pclive7.com):- वाढदिवसानिमित्त होणाऱ्या पार्ट्या आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत उद्योजक सागर बोकेफोडे यांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालून दिला. तत्त्वम सोशल फाउंडेशनच्या सामाजिक कार्यापासून प्रभावित होऊन त्यांनी आपला वाढदिवस कान्हे येथील किनारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या सहवासात सेवाकार्य करत साजरा केला.

यावेळी आश्रमातील वृद्धांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट्स तसेच पौष्टिक व आवडीच्या अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. केवळ वस्तूवाटप न करता उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी वृद्धांशी थेट संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची आत्मीयतेने विचारपूस केली. वाढत्या वयात हक्काच्या माणसांची सोबत सुटलेल्या या निराधारांना ‘कोणीतरी आपली काळजी घेणारे आहे’ हा विश्वास या उपक्रमामुळे मिळाला.

एका बाजूला तरुणाईची सामाजिक जाणीव आणि दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे भाव, असा दोन पिढ्यांना जोडणारा भावूक प्रसंग या वेळी पाहायला मिळाला. वाढदिवसावर अनाठायी खर्च करण्यापेक्षा या ज्येष्ठ माऊलींच्या चेहऱ्यावरील हसू आणि समाधान हाच माझ्यासाठी सर्वोत्तम आशीर्वाद असल्याचे मनोगत सागर बोकेफोडे यांनी या वेळी व्यक्त केले. तत्त्वम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प कायम राहील, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
या सेवाकार्यावेळी तत्त्वम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ठिकेकर, सचिव वंदना चौहान, खजिनदार मनीषा थोरात-पिसाळ, सदस्य आयुष चौहान, संदीप पिसाळ, रवींद्र लंघे, कैलास कोकाटे यांच्यासह उद्योजक सागर बोकेफोडे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. झगमगाटाच्या काळात सामाजिक भान जपत साजरा झालेला हा वाढदिवस उपस्थितांची मने जिंकून गेला.




















Join Our Whatsapp Group