पिंपरी (Pclive7.com):- निगडी-भोसरी बीआरटी मार्गावरील टाटा मोटर्सजवळ असलेल्या यशवंतनगर चौकात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेले भव्य ‘नट-बोल्ट’ शिल्प वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचा आरोप करत युवासेनेचे उपशहर प्रमुख कुणाल जगनाडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे ते अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेला दिलेल्या निवेदनात जगनाडे यांनी म्हटले आहे की, यशवंतनगर चौक हा एमआयडीसी परिसर आणि नागरी वस्तीला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा चौक आहे. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, औद्योगिक कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसेच सार्वजनिक वाहतूक आणि जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. मात्र चौकात उभारण्यात आलेल्या अवाढव्य नट-बोल्ट शिल्पामुळे वाहतूक सिग्नल स्पष्टपणे दिसत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.
शिल्पामुळे वाहनांना सरळ मार्गाने जाता येत नसून त्याभोवती वळसा घालावा लागत असल्याने वाहतुकीची गती मंदावते आणि कोंडी निर्माण होते. तसेच अचानक ब्रेक लावण्याच्या घटना वाढत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या शिल्पाचे तातडीने तांत्रिक परीक्षण करून वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा योग्य ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकातील सिग्नलची दृश्यमानता, वाहतूक नियोजन आणि रस्त्यांची रचना सुधारण्याचीही सूचना करण्यात आली आहे. या जनहिताच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन महापालिकेने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी युवासेनेचे उपशहर प्रमुख कुणाल जगनाडे यांनी केली आहे.


















Join Our Whatsapp Group