पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून अवघ्या काही दिवसांत तब्बल २ हजार ५७३ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय ५८ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून दोन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवली. शहरातील चारही परिमंडळांमध्ये संशयित आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून कारवाईचा धडाका लावण्यात आला.

या मोहिमेदरम्यान परिमंडळ एकमध्ये ३६२, परिमंडळ दोनमध्ये २४७, परिमंडळ तीनमध्ये ५७२, तर परिमंडळ चारमध्ये तब्बल १ हजार ३९२ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. सर्वाधिक कारवाई परिमंडळ चारमध्ये झाल्याने त्या भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचे विशेष लक्ष असल्याचे दिसून आले.
५८ गुंड तडीपार..
गणेशोत्सव काळात दहशत निर्माण करण्याची शक्यता असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अंतर्गत ५० आणि कलम ५५ अंतर्गत ८ अशा एकूण ५८ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. त्यामुळे या गुन्हेगारांना उत्सवकाळात शहराबाहेर राहावे लागणार आहे.
तसेच दोन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहात पाठविण्यात आले आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि पोलिसांच्या रडारवर असलेल्या गुन्हेगारांना या कारवाईमुळे मोठा धक्का बसला आहे.
बंधपत्र आणि नोटिसांची कारवाई..
पोलिसांनी बीएनएसएस कलम १२६ अंतर्गत ४१४ जणांकडून शांतता राखण्याचे बंधपत्र घेतले. कलम १२८ अंतर्गत ३२, तर कलम १२९ अंतर्गत २२० जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय बीएनएस कलम १६८ अंतर्गत १ हजार ८०० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. बेकायदा दारूविक्री करणाऱ्या ३५ जणांवरही दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
सोशल मीडियावरही पोलिसांची नजर..
गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणे, धार्मिक तेढ निर्माण करणारे किंवा आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. सोशल मीडिया ग्रुप अॅडमिननी ग्रुपमधील मजकुरावर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; मात्र कायदा हातात घेऊ नका. दहशत, हुल्लडबाजी किंवा कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना मुळीच थारा दिला जाणार नाही. संशयास्पद हालचाली किंवा भडकावू संदेश आढळल्यास त्यावर विश्वास न ठेवता तात्काळ पोलिसांशी अथवा ११२ क्रमांकावर संपर्क साधावा.”


















Join Our Whatsapp Group