भोसरी (Pclive7.com):- जुन्नर तालुक्यातील कणखर आणि संघर्षशील नेतृत्व, गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव आवाज उठविणाऱ्या आशाताई बुचके यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक रणरागिणी, संवेदनशील नेत्या आणि आशादायी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

आशाताई बुचके यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कायम जपली. गोरगरीब, कष्टकरी, वंचित आणि गरजू नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्या सातत्याने पुढाकार घेत होत्या. अन्यायाविरोधात ठामपणे भूमिका घेण्याची त्यांची वृत्ती आणि जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची त्यांची जिद्द यामुळे त्यांनी जुन्नर तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून आशाताई बुचके यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना बळ देतानाच सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची त्यांची संवेदनशीलता कायम प्रेरणादायी राहिली.

आशाताई बुचके यांच्या निधनाने जुन्नर तालुक्याच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहजासहजी भरून निघणारी नाही. त्यांनी जपलेली जनसेवेची भावना, संघर्षाची भूमिका आणि सर्वसामान्यांसाठी काम करण्याची तळमळ पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी राहील.
त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला विनम्र अभिवादन करीत, त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर आशाताई बुचके यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.ॐ शांती!आशाताई बुचके यांना भावपूर्ण श्रद्धांजली!– महेश किसनराव लांडगेआमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड, पुणे.


















Join Our Whatsapp Group