पिंपरी (Pclive7.com):- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या महिंद्रा थार कारवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी वाहतूक पोलिसांनी एमएच 14 एलजे 2525 क्रमांकाच्या थार कारची तपासणी करून वाहन ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित थार कारच्या काचांवर नियमानुसार परवानगी नसताना काळी फिल्म लावण्यात आली होती. तसेच वाहनावर नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट बसविण्यात आली होती. या प्रकारामुळे वाहनाची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.

वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालका विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत वाहन जप्त केले आहे. शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबविण्यात येत असून काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट, सायरन, बेकायदा फ्लॅश लाईट आणि इतर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कायदेशीर स्वरूपातील नंबर प्लेटचा वापर करावा तसेच वाहनांमध्ये कोणतेही अनधिकृत बदल करू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.


















Join Our Whatsapp Group