पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने कॉपर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल १९ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तळेगाव एमआयडीसी, चिखली आणि देहूरोड परिसरातील एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम लोणकर आणि पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १८ लाख ७४ हजार रुपयांचे कॉपर, एक चारचाकी वाहन आणि आयशर वाहन जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींनी तळेगाव एमआयडीसी व चिखली परिसरातील विविध ठिकाणांवरील वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (डीपी) मधील कॉपर वायर आणि केबल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पडताळणी केली असता तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहा आणि चिखली पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण आठ गुन्हे या टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले.

याचबरोबर गुन्हे शाखा युनिट-४ पथकाने देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या केबल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अजय प्रल्हाद गायकवाड (रा. चिखली) याला अटक केली. त्याच्याकडून केबल वायर, दोन ग्राइंडर मशीन, दोन रेग्युलेटर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा १ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहा, चिखली पोलीस ठाण्यातील दोन आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले व गुन्हे शाखा युनिट-४, सहायक पोलीस फौजदार लोणकर, वायभसे, पोलीस हवालदार मोरे, महाडीक, सोडगीर, असवले, सोनटक्के, बोराटे, पोलीस शिपाई मेरगळ, वेताळ, खेडकर, सुखदाने, मुंडे, नागरे, सोनवणे, बाळसराफ, खराडे, माटे तसेच तांत्रीक विश्लेषन शाखेकडील सहायक पोलीस फौजदार माळी, पोलीस हवालदार ननावरे, पोलीस शिपाई कारके यांनी केली आहे.



















Join Our Whatsapp Group