पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी गाव प्रभाग क्र.२१ मधील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबिर शनिवार, दि.२५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक संस्था हॉल, नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपरी गाव येथे होणार आहे.

या शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला, तसेच आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय तपासणीनंतर गरज भासणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी मोफत अथवा अत्यल्प दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञांची विशेष तपासणी, दंत तपासणी तसेच विविध आजारांवरील उपचार आणि मार्गदर्शनाची सुविधा नागरिकांना मिळणार आहे. तपासणीसाठी येताना नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय अहवाल व कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक संदीप वाघेरे, नगरसेवक हिरानंद (डब्बू) आसवानी, नगरसेविका निकिता कदम आणि नगरसेविका प्रियांका कुदळे यांनी केले असून AIIMS हॉस्पिटल, औंध यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

प्रभागातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. “निरोगी नागरिक – सुदृढ समाज” या संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




















Join Our Whatsapp Group