पिंपरी (Pclive7.com):- शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘शिक्षणमहर्षी’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आज (दि. २४) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. हीच भूमिका स्वीकारत डॉ. पी. डी. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. विशेषतः कामगार, शेतकरी, ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण संस्थांनी गुणवत्ता, संशोधन, कौशल्य विकास आणि आधुनिक शिक्षणपद्धती यांचा प्रभावी संगम साधला आहे.

डॉ. पी. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डी. वाय. पाटील विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, जैवतंत्रज्ञान तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, संशोधनाला चालना आणि सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांमुळे संस्थेने देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत डॉ. पाटील यांनी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या या बहुमोल कार्याची दखल घेत राष्ट्रीय श्रमिक आघाडीने त्यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्काराने गौरविण्याचा निर्णय घेतल्याचे भोसले यांनी सांगितले.

हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, शिक्षण क्षेत्रात निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणसेवकांचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सन्मानामुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केला.



















Join Our Whatsapp Group