पिंपरी (Pclive7.com):- पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. सध्या पवना धरण ९७ टक्के भरले असून धरणातून नदीपात्रात ५ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू होता. वाढता येवा लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून विसर्ग वाढवून ७ हजार क्युसेक केला आहे.

पवना धरण प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून परिस्थितीनुसार पुढील काही तासांत विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून ९ हजार क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सततच्या पर्जन्यामुळे पवना नदी, ओढे आणि नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, पवना नदी खोऱ्यातील ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group