पिंपरी चिंचवडमध्ये पुणे लेगसी लायन्स क्लबची स्थापना
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये पुणे लेगसी लायन्स क्लब हा नवीन क्लब सुरू होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. एका क्लब मधून दुसरा क्लब तयार होतो, तेव्हा नवीन ऊर्जा निर्माण होते. लीडर होण्यासाठी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली याचा आदर्श घ्यावा. नम्र, प्रामाणिक, संभाषण कौशल्य, जोखीम पत्करण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. युवकांना क्लबमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मालपाणी उद्योग समुहाचे ज्येष्ठ उद्योजक लायन गिरीश मालपाणी यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरात लायन्स क्लब ऑफ पुणे लेगसी या नवीन लायन्स क्लबची स्थापना करण्यात आली असून, या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मालपाणी उद्योग समूहाचे ज्येष्ठ उद्योजक लायन गिरीश मालपाणी आणि लायन सुनिता मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन श्रेयस दीक्षित, लायन राजेंद्र मुच्छल, लायन सलीम सिकलगार, लायन विद्या वखारे आदी उपस्थित होते. नवीन लायन क्लबचे चार्टर प्रेसिडेंट म्हणून लायन राकेश पिल्ले, सचिव म्हणून लायन रविराज साबळे, लायन जितेश वखारे यांनी सूत्रे हाती घेत शपथ घेतली. लायन सुनीता मालपाणी यांनी नवीन कार्यकारिणीला शपथ दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
लायन गिरीश मालपाणी म्हणाले, की शिवाजी महाराजांनी शिवराज्य स्थापन केले, तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम जिजाऊंनी केले. त्याप्रमाणे लायन्स क्लबमध्ये महिलांनी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सांभाळावी. हा क्लब यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एकमेकांविषयी विचार करण्याची मानसिकता ठेवा.
लायन श्रेयस दीक्षित म्हणाले, की नवीन लोकांनी जुन्याचे अनुकरण करावे. तुमची जबाबदारी वाढली आहे. नवीन येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करावे.
लायन सुनीता मालपाणी म्हणाल्या, नवीन मेंबर या क्लबशी जोडले जात आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण सर्व मिळून काम करु तेव्हा एकाच वेळी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. यातून व्यक्तिमत्व विकास होईल. जेव्हा गरज असेल तेव्हा लायन मेंबर मदतीला धावून येतील. सेवाकार्य करण्याची मोठी संधी आहे.

लायन राजेंद्र मुछल म्हणाले, की आपले नेतृत्वगुण लोकांसमोर आणायचे असतील तर लायन्स क्लब हा चांगले व्यासपीठ आहे. मोठी जबाबदारी सांभाळायची तर अडचणी, विरोध तर होणार आहे. आपलेच जवळचे गैरसमज निर्माण करतात. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला हवे. जीवनात स्ट्रगल करायला शिका. तरच यश मिळेल. सकारात्मक विचार बाळगा.
लायन राकेश पिल्ले म्हणाले, लायन्स क्लबला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आहे. शिक्षण, आरोग्य, क्रीडा क्षेत्राला पुढे घेऊन जाणार आहे.
लायन रविराज साबळे यांनी सिक्रेटरी अनाउन्समेंट केली. जितेश लोढा यांनी स्वागत केले. शुभेच्छापर मार्गदर्शन लायन सलीम शिकलगार यांनी केले. सूत्रसंचालन कोमल सोनवणे कोमल गौंदडकर यांनी, तर लायन विद्या वाखारे यांनी आभार मानले.



















Join Our Whatsapp Group