पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने उल्लेखनीय कामगिरी करत मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले असून एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. त्याच अनुषंगाने ८ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अजित रुपनवर व त्यांच्या सहकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली. चिखली येथील घरकुल परिसरात एक रेकॉर्डवरील आरोपी चोरीच्या दुचाकींची विल्हेवाट लावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव जॉर्डन राजेश साळवे (वय २०, रा. घरकुल, चिखली) असे सांगितले.

आरोपीच्या ताब्यातील होंडा ॲक्टिव्हा (एमएच १४ एफक्यू १६८३) बाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सखोल चौकशीनंतर त्याने सदर वाहन चिखली परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच रुपीनगर येथून हिरो स्प्लेंडर (एमएच १४ जीझेड १२३७) आणि दापोडी परिसरातून आणखी एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याचीही कबुली दिली.
या कारवाईत चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन आणि दापोडी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीस गेलेल्या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक गोसावी, पोलीस उपनिरीक्षक जावळे तसेच पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, तुषार वराडे आणि दिलीप राठोड यांनी पार पाडली.




















Join Our Whatsapp Group