पिंपरी (Pclive7.com):- वाकड पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत विक्रीसाठी आणलेला २५ किलोहून अधिक गांजा जप्त केला असून तिघांना अटक केली आहे. या कारवाईत गांजा, कार आणि मोबाईलसह एकूण २३ लाख ६३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील कस्पटे चौकाजवळ मुळा नदीवरील अर्धवट तयार पुलाजवळ काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वाकड पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत आबा मल्हारी खलाटे, प्रमोद भीमराव गरुडकर आणि गोरक्षनाथ शिवाजी वाळके या तिघांना रंगेहात पकडण्यात आले.
झडतीदरम्यान आरोपींकडून १२ लाख ९३ हजार रुपये किमतीचा २५ किलो ८६५ ग्रॅम गांजा, एक कार आणि मोबाईल फोन असा एकूण २३ लाख ६३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस शिपाई वंदू गिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजाचा साठा कुठून आणला होता आणि तो कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता याचा तपास वाकड पोलीस करीत आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात वाकड पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात असून, शहरात अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे, पोलीस अंमलदार सहायक पोलीस फौजदार दले, पोलीस हवालदार वंदु गिरे, विजय घाडगे, विजय भुसारे मोहम्नद नदाफ, सचिन गायकवाड, विजय मोरे, पोलीस शिपाई कौर्तेय खराडे, ज्ञानदेव झेंडे, कारभारी पालवे, विक्रम भगत, समाधान कायंले, प्रमोद गायके, अभिषेक मांडे, व मंगेश लोखंडे यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे हे करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group