पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाबाबत कडक भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. डीजेचा दणदणाट करून निर्धारित ध्वनीमर्यादा ओलांडल्यास मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, डीजे मालक तसेच वाहन चालक यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालय आणि शासनाने निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादांचे पालन सर्व मंडळांनी बंधनकारकपणे करावे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित डीजे, मिक्सर आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा तातडीने जप्त करण्यात येणार असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.
दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनीमर्यादा भंग केल्याप्रकरणी 31 मंडळांवर कारवाई करण्यात आल्याचा दाखला देत पोलिसांनी गणेश मंडळांना सावध केले आहे. उत्सवाचा आनंद साजरा करताना ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी सर्व गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन करून उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिक व मंडळांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
ध्वनी मर्यादा (डेसिबलमध्ये)
क्षेत्र. सकाळी 6 ते रात्री 10. रात्री 10 ते सकाळी 6
औद्योगिक – 75 dB – 70 dB
वाणिज्य – 65 dB – 55 dB
निवासी – 55 dB – 45 dB
शांतता क्षेत्र – 50 dB -40 dB
ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचे स्पष्ट करत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.





















Join Our Whatsapp Group