पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर व्हावा यासाठी पुणे मेट्रो प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असून गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध राहणार आहे.

पुणे मेट्रोच्या माहितीनुसार, १४ ते १६ सप्टेंबर (गणेश चतुर्थी ते बुधवार) या कालावधीत मेट्रो सेवा नियमित वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी विशेष वेळापत्रक लागू करण्यात आले असून मेट्रो सेवा सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
उत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या अनंत चतुर्दशी (२५ सप्टेंबर) रोजी पुणे मेट्रोचा इतिहास घडणार असून सकाळी ६ वाजल्यापासून २६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजेच सलग ४१ तास अखंड मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. २७ सप्टेंबरपासून सेवा पुन्हा नियमित वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.

महात्मा फुले मंडई स्थानकाचा वापर प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठी
गणेशोत्सव काळात मध्यवर्ती पुण्यातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. मार्गिका १ वरील प्रवाशांनी पेठ भागातील गणपती दर्शनासाठी कसबा पेठ मेट्रो स्थानकाचा वापर करावा. मार्गिका २ वरून येणाऱ्या भाविकांनी वनाज बाजूकडून येत असल्यास डेक्कन जिमखाना, तर रामवाडी बाजूकडून येत असल्यास PMC मेट्रो स्थानकावर उतरावे.
महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकावर गर्दी टाळण्यासाठी हे स्थानक मुख्यत्वे परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १४ ते २६ सप्टेंबर दरम्यान हे स्थानक एकदिशात्मक (Unidirectional) पद्धतीने कार्यरत राहणार आहे. लोकमान्य टिळक पुतळा येथील द्वार क्रमांक ३ हे फक्त प्रवेशासाठी, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील द्वार क्रमांक २ हे फक्त बाहेर पडण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा न्यायालय स्थानकावर इंटरचेंज टाळण्याचे आवाहन
गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मार्गिका १ आणि मार्गिका २ यांमधील बदलासाठी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावरील इंटरचेंज टाळावे, असे पुणे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. त्याऐवजी कसबा पेठ, PMC आणि छत्रपती संभाजी उद्यान या स्थानकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात लाखो भाविक पुण्यात दाखल होणार असल्याने मेट्रो प्रशासनाने केलेल्या या विशेष नियोजनामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group