मावळमधील शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळमधील शेतकरी तसेच संबंधित घटकांच्या अडचणी व भूमिका विचारात घेऊन समन्वयातून सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढावा. तसेच या विषयावरील पुढील कार्यवाहीसाठी मा. मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन बैठक आयोजित करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना महापौर रवि लांडगे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना केली.

आज दिशा समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता महापौर रवि लांडगे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. यावेळी पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात यापूर्वी झालेल्या बैठकीतील चर्चा, मावळ भागातील शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध अडचणी तसेच प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पवना जलवाहिनी प्रकल्पाच्या अनुषंगाने मावळमधील शेतकरी व संबंधित घटकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. यापूर्वी शेतकऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेमध्ये त्यांच्या विविध अडचणी व अपेक्षा समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संबंधित शेतकरी, स्थानिक नागरिक आणि सर्व संबंधित यंत्रणांशी आवश्यक समन्वय साधून त्यांच्या अडचणींचा योग्य विचार करावा आणि सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी सूचना महापौर लांडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरासाठी दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने पवना जलवाहिनी प्रकल्प महत्त्वाचा असून, प्रकल्प पुढे नेताना मावळमधील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांचाही योग्य विचार होणे आवश्यक आहे. शहराची पाण्याची गरज आणि स्थानिक शेतकऱ्यांचे हित या दोन्ही बाबींमध्ये समन्वय साधून सर्वमान्य मार्ग काढण्याची भूमिका असल्याचे महापौर लांडगे यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी झालेल्या बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने आता पुढील निर्णयप्रक्रियेला गती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभाग, जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच अन्य संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक आयोजित झाल्यास प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करून पुढील कार्यवाहीची निश्चित दिशा ठरविता येईल. त्यानुसार मा. मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन पुढील बैठकीचे नियोजन करण्याची विनंती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना करण्यात आली.
“शेतकऱ्यांचे हित आणि शहराची पाण्याची गरज यांचा समन्वय साधणे आवश्यक” – महापौर रवि लांडगे
“पवना जलवाहिनी प्रकल्प हा पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचवेळी मावळमधील शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षांचाही संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर पुढील बैठक आयोजित करून विषयाला गती देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा केली आहे. शहराची दीर्घकालीन पाण्याची गरज पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group