पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिका क्षेत्रातील महिला, बालके, दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीय तसेच गरजू व वंचित घटकांतील पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अर्ज प्रक्रिया अधिक सुटसुटीत व नागरिकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे.

समाज विकास विभागामार्फत विविध घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी महानगरपालिकेच्या स्तरावर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, अर्ज प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे तसेच विहित निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
अर्ज प्रक्रियेदरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबरोबरच आवश्यकतेनुसार ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. विशेषतः डिजिटल माध्यमांचा वापर करताना अडचणी येणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रतेचे निकष, अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती तसेच योजनांशी संबंधित आवश्यक माहिती नागरिकांना स्पष्ट व सुलभ स्वरूपात उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. अर्जातील त्रुटी अथवा तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. तसेच नागरिकांना अर्ज प्रक्रियेसाठी अनावश्यकपणे कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता भासणार नाही, यासाठी आवश्यक प्रशासकीय व्यवस्था सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
“महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. माहितीचा अभाव, तांत्रिक अडचणी किंवा अर्ज प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे कोणताही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहू नये. त्यासाठी संबंधित विभागांनी योजनांची प्रभावी जनजागृती करून अर्ज प्रक्रिया सुलभ व पारदर्शक ठेवावी. प्राप्त अर्जांवर विहित कार्यपद्धतीनुसार वेळेत कार्यवाही करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.”– रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी आवश्यक जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
“महिला व बालकांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती पात्र महिला व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. माहितीच्या अभावामुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी महिला व बालकल्याण समिती आणि प्रशासन यांच्यात आवश्यक समन्वय ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.”– राणी पठारे, सभापती, महिला व बालकल्याण समिती
प्राप्त अर्जांची विहित निकषांनुसार छाननी करणे, पात्र लाभार्थ्यांची निवड नियमानुसार करणे तसेच मंजूर योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना निर्धारित कालमर्यादेत उपलब्ध करून देण्यासाठी समाज विकास विभागाने नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असेही यावेळी सांगण्यात आले. अर्ज स्वीकृतीपासून ते लाभ वितरणापर्यंतच्या प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि गतिमानता राखण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, समिती सदस्या पल्लवी जगताप, रेशमा भुजबळ, निता पाडाळे, सुप्रिया चांदगुडे, सारिका मासुळकर, मनिषा लांडे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे यांच्यासह समाज विकास विभागाचे अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
समाज विकास विभागामार्फत सन २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी पात्र नागरिकांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. तसेच संबंधित योजनांची पात्रता व अटींची माहिती घेऊन महानगरपालिकेच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group