पिंपरी (Pclive7.com):- शाळा सुटली, वर्ग बदलले, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात रमला; मात्र शाळेच्या आठवणी आणि मैत्रीची नाळ आजही तितकीच घट्ट आहे. याच जिव्हाळ्याचा अनुभव हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या २००३ इंग्लिश मीडियम बॅचच्या रियुनियनमध्ये आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचालित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा रविवार, दि.६ सप्टेंबर रोजी श्री कृष्ण पॅलेस हॉटेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या आग्रहाला मान देत शिक्षक ॲड.आशुतोष रानडे, रमेश गाढवे, अनिथा कदम (स्टीवन मिस) आणि कविता गायकवाड, मुकेश पवार आवर्जून उपस्थित राहिले. अनेक वर्षांनंतर शिक्षक आणि विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने वातावरण भावनिक झाले. शिक्षकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि मनोगत व्यक्त केले.
‘गुरुंचे ऋण कधीही फेडता येत नाही’ या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे मार्गदर्शन याबद्दल विद्यार्थ्यांनी विद्यालयाची तसेच शिक्षकांची मनापासून प्रशंसा केली.
कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयातील दिवंगत शिक्षक, कर्मचारी आणि दिवंगत माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत सर्वांनी शोक व्यक्त केला. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे श्लोक म्हणत आपल्या गुरुजनांना मानवंदना दिली.
रियुनियनच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे नियोजन केले होते. संगीत, मनोरंजन आणि हास्य-विनोदाने कार्यक्रमाला रंगत आणली. जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीने शालेय जीवनातील खोड्या, गमती-जमती आणि अविस्मरणीय प्रसंगांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रपरिवाराने शाळेच्या आठवणींमध्ये रमून एकमेकांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.
‘शाळा म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत, तर आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणी, संस्कार आणि नाती आहेत,’ याची प्रचिती या रियुनियनमधून आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमीन अझीझ आणि दिपाली दंदाडे यांनी केले आणि प्राजक्त घोरपडे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत अशाच प्रकारे भविष्यातही स्नेहबंध कायम ठेवण्याचा संकल्प केला.तसेच सर्वांना आकर्षक भेटवस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या अविस्मरणीय रियुनियनचे आयोजन प्राजक्त घोरपडे, विक्रांत वर्मा, अमीन अझीझ, दिपाली दंदाडे, गझलनाझ अल्फोन्स यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे हिंदुस्तान अँटिबायोटिक स्कूलच्या २००३ (इंग्रजी माध्यम) बॅचचा हा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्यांसाठी आठवणींच्या कप्प्यात कायमचा जपून ठेवावा असा ठरला.





















Join Our Whatsapp Group