पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक ३२, जुनी सांगवी येथे ‘घोंगडी बैठक – टप्पा ०६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत पक्ष विस्तार, युवकांचा सहभाग आणि तळागाळापर्यंत संघटना पोहोचविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश किसनराव फलके, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सागर पाचर्णे तसेच चिंचवड विधानसभा प्रमुख बापू कातळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रभाग क्रमांक ३२ मधील शिवसेना, युवासेना तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीचे नियोजन केले होते.
या बैठकीला शाखाप्रमुख, विभागप्रमुख, प्रभागप्रमुख, उपप्रमुख, विधानसभा पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

बैठकीदरम्यान शिवसेनेची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, अधिकाधिक युवकांना संघटनेशी जोडणे, पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक क्षमता वाढविणे आणि पक्ष विस्तारासाठी प्रभावी नियोजन करण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी बोलताना महानगरप्रमुख राजेश फलके यांनी शिवसेनेचे कार्य प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे सांगितले. “तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करूया,” असा निर्धार व्यक्त करत बैठकीचा समारोप करण्यात आला.





















Join Our Whatsapp Group