पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखा-२ अंतर्गत परकीय नागरिक नोंदणी विभागाने बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या एका नायजेरियन महिलेवर कारवाई करून तिला तिच्या मायदेशी हद्दपार केले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक परदेशी महिला बेकायदेशीरपणे राहत असल्याची गोपनीय माहिती परकीय नागरिक नोंदणी विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार विभागाने संबंधित महिलेची चौकशी केली असता तिच्याकडे वैध पासपोर्ट व व्हिसा नसल्याचे आढळून आले. त्यानंतर तिची बायोमेट्रिक पडताळणी ऑनलाईन डीपीएम प्रणालीद्वारे करण्यात आली.
पडताळणीत संबंधित महिलेचे नाव गिफ्ट ओकोह (Gift Okoh) असून ती नायजेरिया देशाची नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. ही महिला २३ सप्टेंबर २०१४ रोजी वैद्यकीय व्हिसावर भारतात आली होती. जयपूर व पालघर येथे वास्तव्यानंतर ती पिंपरी-चिंचवड परिसरात राहत होती. मात्र, तिच्या पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती भारतात वास्तव्यास असल्याचे तपासात उघड झाले.

संबंधित महिलेकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने तिला मायदेशी परत पाठविण्यासाठी नायजेरियन उच्चायुक्तालय, नवी दिल्ली यांच्याकडून इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट तसेच एफआरआरओ मुंबई कार्यालयाकडून एक्झिट परमिट प्राप्त करण्यात आले.
यानंतर ८ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संबंधित महिलेला नायजेरिया येथे डिपोर्ट (हद्दपार) करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त धीरज पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष शाखा-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड, सहायक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा तसेच त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.





















Join Our Whatsapp Group