पिंपरी (Pclive7.com):- सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ध्वनिप्रदूषणाविरोधात मोठी मोहीम राबवत शहर व परिसरातील १६ डॉल्बी साऊंड सिस्टीमवर कारवाई केली. दहीहंडी उत्सवादरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळे आणि डीजे चालकांवर ही कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांना ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने ५ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यांनी संयुक्त कारवाई केली. यामध्ये निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४, पिंपरी १, संत तुकारामनगर १, दापोडी १, हिंजवडी १, बावधन ३, वाकड १, काळेवाडी १, भोसरी १, दिघी १ आणि चाकण दक्षिण १ अशा एकूण १६ डॉल्बी सिस्टीमवर कारवाई करण्यात आली.

कार्यक्रमांदरम्यान निर्धारित ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी सिस्टीमचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डॉल्बी स्पीकर्स, ॲम्प्लिफायर, मिक्सर तसेच इतर ध्वनी उपकरणे जप्त केली. संबंधित आयोजक आणि डीजे चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाईही करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक शांतता आणि पर्यावरण संरक्षण लक्षात घेऊन ध्वनीवर्धक यंत्रणेचा नियमबद्ध व मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.





















Join Our Whatsapp Group