पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या काळेवाडी येथील राजवाडेनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई केली. कडक पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे ७ हजार ४०० चौ. फूट क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त तसेच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यावेळी शहर अभियंता, सहशहर अभियंता (बांधकाम परवानगी व विद्युत), उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, ‘ब’, ‘क’, ‘ड’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी, तसेच कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
या कारवाईसाठी महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील १० कार्यकारी अभियंते, २८ उपअभियंते, कनिष्ठ अभियंते आणि १६ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी देखील या मोहिमेत सहभागी झाले होते.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एमएसएफ जवानांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता. अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी पोकलेन यंत्रे, ५ जेसीबी आणि २५ मजुरांची मदत घेण्यात आली.
तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. महापालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.





















Join Our Whatsapp Group