पिंपरी (Pclive7.com):- निगडी (भक्ती-शक्ती) ते लोणावळा या प्रस्तावित मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून आगामी नियोजनात या मार्गाचा समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चिखले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या मावळ तालुक्यातील लाखो नागरिकांचे दैनंदिन दळणवळण पुणे व पिंपरी-चिंचवडशी जोडलेले आहे. सध्या पिंपरी ते निगडी (भक्ती-शक्ती) मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून, भविष्यात मेट्रोचा विस्तार मावळ भागापर्यंत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मावळ परिसरात अनेक महाविद्यालये, विद्यापीठे आणि औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. तसेच राज्य सरकारने मावळ भागात नवीन MIDC उभारण्याची घोषणा केल्यामुळे भविष्यात या परिसरातील प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत आणि लोणावळा या पट्ट्यात वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विकास लक्षात घेता आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर निगडी (भक्ती-शक्ती) ते लोणावळा मेट्रो मार्गाचा समावेश आगामी बजेटमध्ये करून लवकरात लवकर DPR तयार करण्याची मागणी मनसेने केली आहे. या मेट्रो मार्गामुळे विद्यार्थी, कामगार, नोकरदार आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मनसेकडून व्यक्त करण्यात आला आहे.





















Join Our Whatsapp Group