पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ७ दिवसांत स्वाईन फ्लूचे १७ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्वाईन फ्लूचा धोका कमी झाला होता. आता या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लू आणखीन सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापासून बचावासाठी पुरेशी काळजी घेणे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. बदलत्या वातावरणापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य आहे.

स्वाईन फ्लूचा धोका हा गरोदर महिला, असाध्य आजार आणि लहान मुलांना जास्त असतो. तसेच गर्दीच्या ठिकाणी सातत्याने काम करणाऱ्या लोकांनीही स्वाईन फ्लूचा धोका संभवतो.

मुलांमध्ये ताप, घसा दुखणे व अंगदुखी ही लक्षणे दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस दिसून येत असतील, तर त्वरित डॉक्टरांना भेटून मुलाची तपासणी करावी. घसा दुखणे व ताप यासोबत श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसून येताच त्वरित वैद्यकीय तपासणी करावी. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार किंवा इतर कोणतेही गंभीर फुफ्फुसाचे आजार या आजारांनी पीडित असलेल्या व्यक्तींना स्वाईन फ्लूचा धोका असतो. अशा व्यक्तींनी लसीकरणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. वृद्धांनी अधिक प्रमाणात प्रवास करणे टाळावे आणि प्रदूषणापासून दूर राहावे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे.





















Join Our Whatsapp Group