तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- तळेगाव दाभाडे परिसरात एकाला कोयत्याच्या धाकाने धमकावत तसेच दगड डोक्यात घालून जखमी करत १ हजार रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान इंद्रायणी हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी संतोष लक्ष्मण शेडगे (वय ४०, रा. चिखलसे, ता. मावळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. तर याप्रकरणी अरविंद अमरेश कोळी (वय २२, रा. शंकरवाडी सोमाटणे फाटा) व शुभम हनुमंत कोळी (वय २५, रा. शंकरवाडी, अंगण हॉटेलच्या मागे सोमाटणे) दोघेही तळेगाव दाभाडे परिसरातील असून यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी शेडगे हे त्यांच्या कारमधून जात असताना आरोपींनी त्यांचे वाहन अडवले. आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडे १ हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराला वाहनातून खाली उतरवून मारहाण करत जबरदस्ती पैसे घेतले. तसेच एका आरोपीने हातातील कोयता दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कोयता फिरवत नागरिकांनाही धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमू लागल्याने आरोपी तेथून पसार झाले होते. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे आणि पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत.





















Join Our Whatsapp Group