हिंजवडी (Pclive7.com):- देशातील प्रमुख आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडी परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाढती वाहतूक कोंडी आणि रखडलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आज ग्रामस्थ, स्थानिक नागरिक तसेच आयटी क्षेत्रातील कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे सहभागी होणार असल्याने आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंजवडीतील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना रोजच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना बसत आहे.
वाहतूक कोंडीची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत असून, कार्यालयीन वेळेत अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांची अशी अवस्था का, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनातून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, खड्डेमुक्त हिंजवडी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक, आयटी कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















Join Our Whatsapp Group