पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने विद्युत डीपीमधून तांबे व ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण १६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद या ग्रामीण भागांमध्ये विद्युत डीपीमधून तांबे व ॲल्युमिनियमच्या तारा चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भानोबाची कोयाळी येथून अक्षय बाबासाहेब काळे आणि राहुल दिनकर पोकळे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी फरार आरोपी ललित मगर ऊर्फ नेपाळ्या याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा भंगार व्यावसायिक इजाहर इस्माईल चौधरी आणि ब्रिजमोहन असरफीलाल प्रजापती यांना विकल्याचेही उघड झाले.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ५ लाख १० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तारा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे आळंदी पोलीस ठाण्यातील चार आणि चाकण दक्षिण पोलीस ठाण्यातील तीन असे एकूण सात गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे ग्रामीण भागातील विद्युत यंत्रणेला लक्ष्य करणाऱ्या चोरीच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





















Join Our Whatsapp Group