पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील पिंपळे सौदागर येथील पवना नदीकाठच्या विसर्जन घाटाची भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान श्री गणेशमूर्ती विसर्जन हौदांची स्वच्छता, हौदांची दुरुस्ती व रंगरंगोटी, घाट परिसरातील प्रकाशव्यवस्था तसेच नदीपात्रातील गाळ व कचऱ्याची साफसफाई याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या. भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुयोग्य वातावरणात बाप्पाला निरोप देता यावा, यासाठी सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “गणेशोत्सव हा सर्वांच्या श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. पिंपळे सौदागर आणि परिसरातील हजारो नागरिक विसर्जनासाठी या घाटावर येतात. त्यामुळे घाटावरील स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रकाशव्यवस्था उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. संबंधित विभागांनी सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत.”
या पाहणीवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक, स्वच्छता मुकादम तसेच पर्यावरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवापूर्वी विसर्जन घाटावरील सर्व सुविधा सज्ज करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर कामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.





















Join Our Whatsapp Group