पिंपरी (Pclive7.com):- उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेसाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक जात असून, या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टर बुकिंग, हॉटेल आरक्षण आणि टूर पॅकेजच्या नावाखाली ऑनलाईन सायबर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नागरिक चारधाम यात्रेसाठी जात असल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार अधिकृत वेबसाईटप्रमाणे दिसणाऱ्या बनावट वेबसाईट्स, सोशल मीडिया जाहिराती आणि फसव्या लिंक तयार करून भाविकांना जाळ्यात ओढत आहेत. हेलिकॉप्टर सेवा, हॉटेल बुकिंग किंवा विशेष टूर पॅकेजचे आमिष दाखवत नागरिकांकडून ऑनलाईन पैसे उकळले जात असून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकिंग करताना नागरिकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच गुगल किंवा सोशल मीडियावर दिसणाऱ्या अनोळखी वेबसाईट्स आणि जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असेही सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी नागरिकांना कमी दरातील ऑफर, अनोळखी व्यक्तींचे बँक खाते किंवा मोबाईल क्रमांकावर पैसे पाठविणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत OTP, UPI PIN, CVV क्रमांक, ATM कार्डची माहिती किंवा इतर गोपनीय आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
चारधाम यात्रेची नोंदणी आणि अधिकृत माहितीसाठी उत्तराखंड पर्यटन विभागाच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर “Yatra” असा संदेश पाठवून माहिती मिळवता येणार आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी संबंधित वेबसाईटची सत्यता आणि सेवा प्रदात्याची अधिकृतता तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर फसवणुकीचा प्रकार घडल्यास नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी किंवा १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group